शुक्रवार, १७ ऑगस्ट, २०१२

आपल्या सनातन संस्कृतीची आपल्याला मिळालेली एक अमूल्य देणगी - पंचगव्य !!


आपल्या ऋषीमुनिनी मनुष्याच्या गरजा ओळखून रोजचे जीवन गोवंशाबरोबर जोडले होते. त्याकाळी संस्कृत हीच शास्त्रोक्त भाषा होती. त्यामुळे शास्त्रोक्त तसेच वैज्ञानिक ज्ञान संपूर्ण संस्कृत भाषेतच वर्णन केलेले आहे. इंग्रजांनी भारतात आल्यावर भारतीयांची स्वस्थतेची करणे जाणून घेऊन ती नष्ठ करण्यास सुरुवात केली. जिला आम्ही 'गोमाता' संबोधतो तिलाच आमच्यापासून दूर केले. परंतु आपल्या रोगी समाजावर निरोगी गोवंश हेच एकमेव उत्तर आहे.

गायीच्या शेणामध्ये असणा-या Rizobium आणि Azetobacter नावाच्या जीवाणूंमुळे जमिनीतील आवश्यक पोषक अंश उपलब्ध होतात. तसेच शेण, गोमुत्र आणि गुळापासून बनवलेले पाणी ठराविक मात्रेत वापरले असता झाडाना अधिक फायदा होतो म्हणजेच ते वनस्पतींचे खाद्य आहे. यामुळे जमिनीत असणारे आणि झाडांना उपयोगी ठरणारे पोषक अंश ब-याच प्रमाणात झाडांना उपलब्ध होतात. त्यांचे उत्तम पोषण होते आणि त्यामुळे अधिक उत्पादन मिळते. ठराविक वेळेत गोमूत्रापासून बनविलेले कीटकनाशक वापरल्यामुळे वनस्पतींना हानी करणारे कीटक, जीव, जंतू त्या वातावरणापासून दूर पळतात. याचे आंतरराष्ट्रीय पेटंट गोविज्ञान अनुसंधान केंद्र, देवलापूर, नागपूर यांना मिळाले आहे. गोमुत्रामध्ये नैसर्गिकरित्याच vitamin, Sodium, Phosporus, Copper, Urea यांचे अंश असतात. अजूनही काही घटक असण्याची शक्यता वैज्ञानिकांनी वर्तविली आहे. गोमुत्रामध्ये Antifugal, Antimiorobial, Anti-bacterial, Antioxident, Anti Cancer घटक द्रव्ये असतात. त्यामुळेच कदाचित गोवंश आधारित शेती समृद्ध होती. बैलगाडी आणि बैलांचा नांगर शेतात फिरत राहिल्याने नकळतच त्यांचे शेण आणि गोमुत्र मातीत मिसळत राहिल्याने जमीन समृद्ध होते.

गोवंशाच्या मृत्युपर्यंत त्याचे शेण व मूत्र अखंड प्राप्त होते. दुध मात्र फक्त गायीपासून मिळते तेही तच्या १/३ आयुष्यातच. असे असताना केवळ दुधाच्या आधारे गायीच्या फायद्याचा विचार केला गेला. तिचे दुध मिळणे बंद झाल्यावर ती निरुपयोगी वाटू लागली व तिच्या विक्रीचे विचार शेतक-यांच्या डोक्यात येऊ लागले. 'गोमय बसते लक्ष्मी !' हा सिद्धांत आपण विसरलो.

गायीपासून मिळणा-या दुध, दही, तूप, गोमुत्र व गोमय (शेण) या पाचही द्रव्यांना आयुर्वेदाने पंचगव्य म्हटले आहे. ज्याचा आयुर्वेदिक औषधात ब-याच ठिकाणी उपयोग केला जातो.

आयुर्वेदाप्रमाणे निरोगी व्यक्तीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी प्राचीन ऋषीमुनींनी शेणापासून बनवलेल्या गोव-या, तूप आणि काही वनस्पतींनी अग्निहोत्र, मंजन, कोळसा स्नानासाठी गोवरी जाळून केलेल्या राखेचा उपयोग, केस धुण्यासाठी गोमुत्र ( Anti - Danruff and conditiones ) तसेच अंजन बनवण्यासाठी गायीच्या तुपाचा दिवा, शेणापासून बनवलेली धुपबत्ती यांचा नियमित वापर केला.

जेवणाच्या पहिल्या घासाबरोबर तूप घेतले असता भूक आणि पचनशक्ती वाढते. सुखपूर्वक मलप्रवृत्ती होते. शरीरातील सर्व मासपेशी आणि सांधे कार्यक्षम राहतात. नेत्रशक्ती आणि स्मृती वाढते. निरोगी, स्वदेशी गायीचे दुध, दही, लोणी, ताक आणि तूप शरीराचे उत्तम पोषण करते. आहार, विहार अयोग्य असेल तर शरीरामध्ये निरनिराळ्या रोगांची उत्पत्ती होते. अशावेळी गोमुत्राचा वापर शरीरातील अपरिचित घटकांना बाहेर काढण्यासाठी होतो. म्हणूनच आपले आरोग्य ठीक ठेवायचे असेल तर गोवंशाचे निरोगी राहणे आवश्यक आहे. त्यासाठी गोवंशाला नियमित हिरवा चारा, पाणी, कडबा, ढेप, पेंड, गवत आणि रोजच्या रोज गायरानात फिरणे आवश्यक आहे. नियमित वेळेत तिला पशु वैद्याकडून तपासून घेतले पाहिजे.

कामधेनु, गोमुत्र, अर्कावर संशोधन करत असताना त्यासाठी पेटंटचे काम केले गेले. त्यासाठी गोमुत्राचा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास केला गेला. ज्या गोवंशाचे गोमुत्र औधाधी उपयोगात आणायचे असेल ते मनुष्याचे अन्नसेवन करणारे नसावे, असे शास्त्रवचन आहे आणि ते त्या प्रयोगानी सिद्ध झाले आहे.

गायीच्या गोव-या ज्या वातावरणात जाळल्या जातात त्याने तो संपूर्ण परिसर शुद्ध होतो हे बनारस विश्व विद्यालयाने सिद्ध केले आहे.

पंचगव्याचे गुणधर्म -

१. गोदुग्ध - दृष्ठीसाठी हितकार, स्मरणशक्तीवर्धक, गर्भिणी तसेच गर्भाचे पोषण करणारे, शुक्रधातुंची वाढ करणारे असून त्यात vitamin A विशेषत्वाने असते.

२. गो-दधी - अग्निवर्धक तसेच अतिसार ( जुलाब) यात हितकर.

३. गो-घृत - या आधी वर्णन केलेल्या गुणांसोबतच जखम लवकर भरण्याचा गुणधर्म यात आहे.

४. गोमुत्र - यात क्षारांचे गुणधर्म आहेत जे विषघ्न आहे.

५. गोमय - याचे चूर्ण, राख, काढा, कोळसा तसेच ताजे गरम गरम शेण उपयोगी आहे. आपल्या डोळ्यांना न दिसणारे माणसासाठी हानीकारक जीवाणू याच्या धुराने त्या परसरापासून दूर जातात. म्हणून कदाचित होळीच्या दिवशी ठिकठिकाणी एकाच वेळी होळीमध्ये जाळल्या जन-या गोव-या / शेणी संपूर्ण गावातील जीवाणू पळवून लावण्यासाठी केलेली उपाययोजना तर नसेल???

एखाद्या व्यक्तीच्या मृत्युनंतर अंत्यसंस्कारानंतर संपूर्ण घर शेणाने सरावले जाते. एवढेच नव्हे तर अंत्ययात्रेमध्ये गोव-यांचा धूर आधी आणि नंतर शव वाहून नेले जाते. बनारस विश्व विध्यालयात यज्ञामध्ये वापरल्या जाणा-या सामिधांच्या औषधी, गायीचे शेण आणि तूप यापासून बनवलेल्या धुपबत्तीचे परीक्षण केले असता त्यामध्ये वातावरण शुद्ध करण्याची क्षमता दिसून आली. एकट्या गायीपासून आपल्याला शरीरपोषक, रसायन, वाजीकरण, शरीरशोधन, पर्यावरण शुद्धी, जमिनीचे पोषण व कीटक नियंत्रण इ. गोष्ठी मिळू शकतात. म्हणूनच दैनंदिन जीवनात पंचगव्याचा समावेश होणे आवश्यक आहे.

आजारी पडल्यावर पंचगव्याच्या वापरणे अथवा त्यापासून बनवलेल्या औषधाने बरेच आजार दूर होतात.

वाट, पित्त व कफ या त्रिदोषांमुळे रोगांची उत्पत्ती होते. गोमुत्रामुळे प्रामुख्याने वातापासून व कफापासून होणारे रोग बरे दूर होतात. एक्झिमा, सोरीयासीस, पांढरे डाग इ. आजारांमध्ये गोमुत्राचा उपयोग सिद्ध झाला आहे. लिव्हर सिरोसीस सारख्या आजारात तर गोमुत्राचा आयुर्वेदीय प्रभाव सिद्ध झाला आहे. कधी कधी पोट साफ नसल्यामुळे अएक आजार दिसून येतात. अशावेळी गोमुत्र वटी किवा गोमुत्र घेतले असता पोट साफ होते. ज्यांना जुनाट दमा आहे त्यांना गोमुत्रासव आणि विभितकावलहे प्रभावी आहे.

वातव्याधींमध्ये औषधीसिद्ध हिंग्वाद्य घृत, वारंवार गर्भपात, वंध्यत्वासाठी फलघृत तसेच व्रणासाठी कडूनिंब, हळद यांनी सिद्ध केलेले जात्यादी घृत वापरले जाते. गायीच्या तुपापासून बनलेल्या अनेक औषधी आज व्याधी निवारणासाठी वापरल्या जातात.

मंजीष्ठासारखी चूर्णे, गोदुग्ध यांनी तयार केलेले चंदनादी यमक तसेच मुलतानी माती व गोमययुक्त उटणे इ. गोष्ठीनी त्वचेची कांती सुधारते. वारंवार जुलाब होणे, ग्रहणी यांसारख्या आजारात ताक्ररिष्ठ उपयोगी पडते. पंचाकार्मातील वामन, विरेचनापुर्वी गायीचे तूप प्यायला दिले जाते. औषधीसिद्ध दुधाचा वापर बस्तीसाठी, तसेच ताक्रधारा इ. चिकित्सा प्रचलित आहेत. आम संचित अवस्थेत गोमुत्राचा शोधन बस्ती किवा वजन कमी करण्यासाठी गोमुत्र आवश्यक आहे. अशा प्रकारे शास्त्रोक्त चिकित्सा पद्धतीत पंचगव्याचा उपयोग आहे.

संपर्क - प्रधान गो विज्ञान अनुसंधान केंद्र, देवलापूर, नागपूर.

( महत्वाची सूचना - हा लेख वैद्य. डॉ. नंदिनी भोजराज. एम. डी. (आयु) यांच्या वैद्यराज या त्रैमासिकात प्रकाशित झालेल्या लेखाचा काही भाग आहे. )





अध्यात्म आणि भौतिकशास्त्र !!


काल दादरला एका कार्यक्रमासाठी गेलो असताना मेजेस्टिक बुक डेपो मध्ये गेलो होतो. तिथे भौतिकशास्त्र आणि अद्यात्म हे The Tao of Physics या एक जागतिक कीर्तीप्राप्त अणुवैज्ञानिक डॉ. फ्रीत्जोफ केप्रा यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद असलेले पुस्तक खरेदी केले. सदर अनुवाद आमचे मित्र श्री. अविनाश ताडफळे यांनी केला आहे. आणि याची पूर्वकल्पना असल्याने ते पुस्तक लगेच वाचायला घेतले. शिवाय आपल्या हिंदू धर्मग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर बिगबेंग हा महाप्रयोग जेथे होत आहे त्या प्रयोग शाळेच्या प्रांगणात भगवान शिवाची नटराज रूपातील मूर्ती स्थापित केली गेली हे माहित असल्यामुळे ह्या पुस्तकाबद्दल उत्कंठता होतीच.

या पुस्तकाला प्रस्तावना 'भारत विश्व ज्ञानपीठाचे कुलाधीपती पद्मश्री डॉ. विजय भटकर यांनी दिली आहे. आपल्या प्रस्तावनेत त्यांनी या पुस्तकाचा सारांश मांडताना दिलेले काही मुद्दे मी खाली देत आहे.

" डॉ. केप्रा ह्यांनी ह्या पुस्तकाद्वारे सर्वप्रथम एक नवीन क्रांतिकारी विचार मांडला आहे. त्यांनी हे दाखवून दिले आहे कि, देकार्त व न्यूटनच्या वेळचे भौतिकशास्त्र ( जे अभिजात भौतिकशास्त्र म्हणून ओळखले जाते), स्थूल जगातील घटनांचे विश्लेषण करण्यासाठी व आपल्या नेहमीच्या जीवनातील तांत्रिक प्रश्न सोडवण्यासाठी उपयुक्त जरूर आहे, परंतु ह्यातून चैतन्य आणि जड वस्तूच्या द्वैतवादाचा जन्म झाला व अशा खंडित दृष्ठीकोनामुळे सृष्ठी, व्यक्ती व समाजाचे विभाजन केले गेले आणि व्यक्तीचे, समाजाचे आणि सृष्ठीचे केलेले विभाजनच, आजच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणाच्या पेचप्रसंगाना कारणीभूत आहे. त्याने निर्माण केलेल्या यांत्रिकी दृष्ठीकोनामुळे समाजात अनेक चुकीच्या कल्पना आणि नितीमुल्ये निर्माण झाली."

"परंतु अनुविज्ञानातील संशोधनामुळे भौतिकशास्त्रज्ञांच्या हे लक्षात आले कि, अणुजगताच्या पातळीवर हि सृष्ठी मुलभूत घटकांनी बनलेले एक यंत्र नसून, आपापसातील संबंधांचे एक जाळे आहे आणि संबंधांच्या ह्या जाळ्यात, घटक अस्तित्वातच नाहीत. अशा प्रकारे आधुनिक भौतिकशास्त्रात विश्वाकडे एक यंत्र म्हणून न बघता, सजीव पूर्ण म्हणून बघितले जाऊ लागले."

" डॉ. केप्रा ह्यांनी पाश्चिमात्य जगात हा विचार अत्यंत प्रभावीपणे मांडला कि, पौर्वात्य अध्यात्माच्या (यात हिंदू, बौद्ध आणि टाओवादाचे धार्मिक तत्वज्ञान समाविष्ठ आहे.) विश्वाविषयीच्या दृष्ठीकोनानुसार देखील जगातील सर्व गोष्ठी व घटना ह्या एकमेकांशी संबंधित व परास्परावलंबी असून, त्या सर्व एकाच अंतिम सत्याची वेगवेगळी रूपे आहेत. जगाची वेगवेगळ्या भागात विभागणी करून, स्वतःला ह्या जगाहून वेगळे व्यक्तिमत्व मानण्याची आपली प्रवृत्ती हा आपला बुद्धिभ्रम आहे."

हे मुद्दे वाचताना माझ्या लक्षात आले कि हे तर आपल्या धर्मात आधीच सांगितले आहे. आणि अगदी हेच मी माझ्या एका सहका-याला काही दिवसापूर्वी सांगत होतो. माझा एक सहकारी जो इंजिनिअर आहे. त्याचे म्हणणे होते कि, "मृत्यू हा स्वीकारार्ह नाही." मी त्याला का म्हणून विचारले तेव्हा तो म्हणाला कि, " आपण हे सगळे निर्माण करायचे. आपली संपत्ती, ऐश्वर्य, आपले नातेवाईक. हे सगळे निर्माण केल्यावर एक दिवस हे सगळे सोडून जायचे??" मी त्याला म्हटले, " तू काय निर्माण केलेस?? आणि जे तू निर्माण केले आहेस ते तू एकट्याने निर्माण केले आहेस का?? तुझे आईवडील, भाऊ बहिण हे सगळे तुझ्या एकट्यामुळे एकत्र आलेत का?? तू आज जो इथे माझ्याशी बोलतोयस ते फक्त तुझ्या एकट्या मुळे आहे का??

अर्थातच नाही.

तुझे ऐश्वर्य किवा जे काही म्हणून तू निर्माण केलेस ते तू एकट्याने निर्माण केले नसून अनेक लोकांचा त्यात सहभाग आहे. उदाहरणार्थ, तुझे घर बांधायचे असेल तर तू घर बांधायला घेणार हा तुझा संकल्प असेल पण ते घर बांधणारे गवंडी, तुला पैसा पुरवणारी वित्तसंस्था ह्या सगळ्यांचे त्यात योगदान आहे. तुझा घर बांधण्याचा संकल्प हा त्या बांधकाम करणा-या मजुरांचे पोषण करण्याचे साधन झाला. याचाच अर्थ तू आणि ते गवंडी हे कुठेतरी जोडले गेलेला होतात आणि वेळ येताच एकत्र येऊन तुम्ही क्रिया केली. तुझे आई वडील, भाऊ बहिण ह्या सगळ्यांचे एकत्र येण्याने तुझे कुटुंब बनले. मी माझी जुनी कंपनी सोडली म्हणून मी आज इथे आहे आणि तुझ्याशी बोलतोय. म्हणजेच आपण सगळे फक्त एक निमित्त आहोत.

आपण वेगवेगळे नसून एकाच कार्यासाठी आवश्यक असलेले एकरूप घटक आहोत. आणि आपले सर्वांचे एक मूळ रूप आहे.

आणि मृत्यू म्हणजे तरी काय रे?? विज्ञान सुद्धा मानते कि, या विश्वात बाहेरून काही येत नाही आणि बाहेर काही जात नाही. संपूर्ण विश्व हे एकाच चैतन्याचे बनलेले आहे. त्याला ते उर्जा म्हणतात. याचाच अर्थ मृत्यू म्हणजे कायमचा अंत नसून एक स्थित्यंतर आहे. ज्या क्रियेसाठी तुझी आवश्यकता होतो ती क्रिया संपताच एका दुसर्या क्रियेसाठी तुझी आवश्यकता असल्यामुळे केलेले स्थित्यंतर. तू अविनाशी आहेस. कारण तू त्या एका अंतिम सत्याचा घटक आहेस. आणि म्हणून तूच ते अंतिम सत्य आहेस.

या पुस्तकातले सर्व तत्वज्ञान जरी मला सांगणे शक्य नसले तरी आपले अध्यात्म आणि भौतिक शास्त्राचे नवीन सिद्धांत यात असलेले कमालीचे साधर्म्य या पुस्तकात मांडले आहे. मी सर्वाना विनंती करेन कि एकदा हे पुस्तक जरूर वाचावे. आणि सरतेशेवटी मी आमचे मित्र श्री. अविनाश ताडफळे यांचे आभार मानेन कि त्यांनी हे अमूल्य पुस्तक मराठीत अनुवादित करून आम्हा सर्वाना वाचण्यास उपलब्ध करून दिले.