शुक्रवार, १७ ऑगस्ट, २०१२

अध्यात्म आणि भौतिकशास्त्र !!


काल दादरला एका कार्यक्रमासाठी गेलो असताना मेजेस्टिक बुक डेपो मध्ये गेलो होतो. तिथे भौतिकशास्त्र आणि अद्यात्म हे The Tao of Physics या एक जागतिक कीर्तीप्राप्त अणुवैज्ञानिक डॉ. फ्रीत्जोफ केप्रा यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद असलेले पुस्तक खरेदी केले. सदर अनुवाद आमचे मित्र श्री. अविनाश ताडफळे यांनी केला आहे. आणि याची पूर्वकल्पना असल्याने ते पुस्तक लगेच वाचायला घेतले. शिवाय आपल्या हिंदू धर्मग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर बिगबेंग हा महाप्रयोग जेथे होत आहे त्या प्रयोग शाळेच्या प्रांगणात भगवान शिवाची नटराज रूपातील मूर्ती स्थापित केली गेली हे माहित असल्यामुळे ह्या पुस्तकाबद्दल उत्कंठता होतीच.

या पुस्तकाला प्रस्तावना 'भारत विश्व ज्ञानपीठाचे कुलाधीपती पद्मश्री डॉ. विजय भटकर यांनी दिली आहे. आपल्या प्रस्तावनेत त्यांनी या पुस्तकाचा सारांश मांडताना दिलेले काही मुद्दे मी खाली देत आहे.

" डॉ. केप्रा ह्यांनी ह्या पुस्तकाद्वारे सर्वप्रथम एक नवीन क्रांतिकारी विचार मांडला आहे. त्यांनी हे दाखवून दिले आहे कि, देकार्त व न्यूटनच्या वेळचे भौतिकशास्त्र ( जे अभिजात भौतिकशास्त्र म्हणून ओळखले जाते), स्थूल जगातील घटनांचे विश्लेषण करण्यासाठी व आपल्या नेहमीच्या जीवनातील तांत्रिक प्रश्न सोडवण्यासाठी उपयुक्त जरूर आहे, परंतु ह्यातून चैतन्य आणि जड वस्तूच्या द्वैतवादाचा जन्म झाला व अशा खंडित दृष्ठीकोनामुळे सृष्ठी, व्यक्ती व समाजाचे विभाजन केले गेले आणि व्यक्तीचे, समाजाचे आणि सृष्ठीचे केलेले विभाजनच, आजच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणाच्या पेचप्रसंगाना कारणीभूत आहे. त्याने निर्माण केलेल्या यांत्रिकी दृष्ठीकोनामुळे समाजात अनेक चुकीच्या कल्पना आणि नितीमुल्ये निर्माण झाली."

"परंतु अनुविज्ञानातील संशोधनामुळे भौतिकशास्त्रज्ञांच्या हे लक्षात आले कि, अणुजगताच्या पातळीवर हि सृष्ठी मुलभूत घटकांनी बनलेले एक यंत्र नसून, आपापसातील संबंधांचे एक जाळे आहे आणि संबंधांच्या ह्या जाळ्यात, घटक अस्तित्वातच नाहीत. अशा प्रकारे आधुनिक भौतिकशास्त्रात विश्वाकडे एक यंत्र म्हणून न बघता, सजीव पूर्ण म्हणून बघितले जाऊ लागले."

" डॉ. केप्रा ह्यांनी पाश्चिमात्य जगात हा विचार अत्यंत प्रभावीपणे मांडला कि, पौर्वात्य अध्यात्माच्या (यात हिंदू, बौद्ध आणि टाओवादाचे धार्मिक तत्वज्ञान समाविष्ठ आहे.) विश्वाविषयीच्या दृष्ठीकोनानुसार देखील जगातील सर्व गोष्ठी व घटना ह्या एकमेकांशी संबंधित व परास्परावलंबी असून, त्या सर्व एकाच अंतिम सत्याची वेगवेगळी रूपे आहेत. जगाची वेगवेगळ्या भागात विभागणी करून, स्वतःला ह्या जगाहून वेगळे व्यक्तिमत्व मानण्याची आपली प्रवृत्ती हा आपला बुद्धिभ्रम आहे."

हे मुद्दे वाचताना माझ्या लक्षात आले कि हे तर आपल्या धर्मात आधीच सांगितले आहे. आणि अगदी हेच मी माझ्या एका सहका-याला काही दिवसापूर्वी सांगत होतो. माझा एक सहकारी जो इंजिनिअर आहे. त्याचे म्हणणे होते कि, "मृत्यू हा स्वीकारार्ह नाही." मी त्याला का म्हणून विचारले तेव्हा तो म्हणाला कि, " आपण हे सगळे निर्माण करायचे. आपली संपत्ती, ऐश्वर्य, आपले नातेवाईक. हे सगळे निर्माण केल्यावर एक दिवस हे सगळे सोडून जायचे??" मी त्याला म्हटले, " तू काय निर्माण केलेस?? आणि जे तू निर्माण केले आहेस ते तू एकट्याने निर्माण केले आहेस का?? तुझे आईवडील, भाऊ बहिण हे सगळे तुझ्या एकट्यामुळे एकत्र आलेत का?? तू आज जो इथे माझ्याशी बोलतोयस ते फक्त तुझ्या एकट्या मुळे आहे का??

अर्थातच नाही.

तुझे ऐश्वर्य किवा जे काही म्हणून तू निर्माण केलेस ते तू एकट्याने निर्माण केले नसून अनेक लोकांचा त्यात सहभाग आहे. उदाहरणार्थ, तुझे घर बांधायचे असेल तर तू घर बांधायला घेणार हा तुझा संकल्प असेल पण ते घर बांधणारे गवंडी, तुला पैसा पुरवणारी वित्तसंस्था ह्या सगळ्यांचे त्यात योगदान आहे. तुझा घर बांधण्याचा संकल्प हा त्या बांधकाम करणा-या मजुरांचे पोषण करण्याचे साधन झाला. याचाच अर्थ तू आणि ते गवंडी हे कुठेतरी जोडले गेलेला होतात आणि वेळ येताच एकत्र येऊन तुम्ही क्रिया केली. तुझे आई वडील, भाऊ बहिण ह्या सगळ्यांचे एकत्र येण्याने तुझे कुटुंब बनले. मी माझी जुनी कंपनी सोडली म्हणून मी आज इथे आहे आणि तुझ्याशी बोलतोय. म्हणजेच आपण सगळे फक्त एक निमित्त आहोत.

आपण वेगवेगळे नसून एकाच कार्यासाठी आवश्यक असलेले एकरूप घटक आहोत. आणि आपले सर्वांचे एक मूळ रूप आहे.

आणि मृत्यू म्हणजे तरी काय रे?? विज्ञान सुद्धा मानते कि, या विश्वात बाहेरून काही येत नाही आणि बाहेर काही जात नाही. संपूर्ण विश्व हे एकाच चैतन्याचे बनलेले आहे. त्याला ते उर्जा म्हणतात. याचाच अर्थ मृत्यू म्हणजे कायमचा अंत नसून एक स्थित्यंतर आहे. ज्या क्रियेसाठी तुझी आवश्यकता होतो ती क्रिया संपताच एका दुसर्या क्रियेसाठी तुझी आवश्यकता असल्यामुळे केलेले स्थित्यंतर. तू अविनाशी आहेस. कारण तू त्या एका अंतिम सत्याचा घटक आहेस. आणि म्हणून तूच ते अंतिम सत्य आहेस.

या पुस्तकातले सर्व तत्वज्ञान जरी मला सांगणे शक्य नसले तरी आपले अध्यात्म आणि भौतिक शास्त्राचे नवीन सिद्धांत यात असलेले कमालीचे साधर्म्य या पुस्तकात मांडले आहे. मी सर्वाना विनंती करेन कि एकदा हे पुस्तक जरूर वाचावे. आणि सरतेशेवटी मी आमचे मित्र श्री. अविनाश ताडफळे यांचे आभार मानेन कि त्यांनी हे अमूल्य पुस्तक मराठीत अनुवादित करून आम्हा सर्वाना वाचण्यास उपलब्ध करून दिले.



1 टिप्पणी:

  1. मी एक लेखिका आहे.भौतिकशास्त्र आणि अध्यात्म ह्या पुस्तकाच्या शोधात मी आहे.हे पुस्तक कुठे मिळू शकेल काही कल्पना आहे का? कृपया कळावे.

    उत्तर द्याहटवा