सोमवार, ६ मे, २०१३

संतांची शिकवण - समर्थ रामदास ( खोटा इतिहास कोण लिहित आहे??? भाग ३ )


महाराष्ट्र हि संतांची भूमी असे आपण नेहमीच ऐकतो आणि बोलतो. पण संतांची शिकवण फक्त ऐकण्यासाठी, बोलण्यासाठी असते असाच समज आपल्या समाजाचा असल्याचे जाणवते. संत साहित्याचे अभ्यासक आणि त्यांची शिकवण समाजाला सांगणारे आपल्याला सोसेल आणि आपल्या विशिष्ठ ध्येयपुर्तीला मानवेल एवढेच संत उचलतात आणि समाजासमोर मांडतात. ज्ञानेश्वर माउली, एकनाथ महाराज, संत तुकाराम, समर्थ रामदास यांची आपल्या सोयीपुरताच भलावण करणारे अनेक जन आहेत. यातून या संतांची खरी शिकवण समाजासमोर कधी येतच नाही. हल्ली तर समाजाचे प्रबोधन करायचे कार्य हाती घेतले आहे असे सांगून समाजाची मान्यता मिळवणारे संतांची देखील समाजात, जाती-पातीत विभागणी करू लागले आहेत. "ज्ञानेश्वर माउली - समर्थ रामदास फक्त ब्राम्हणांचे आणि तुकाराम महाराज, नामदेव महाराज, चोखामेळा हे संत बहुजन समाजाचे" अशी सपशेल वाटणी केली जात आहे.

मुळात संत कधीही कोणा एका जातीचा नसतो. तसे असते तर ज्ञानेश्वर माउलीनी पसायदानात
 " जे खळांची व्यंकटी सांडो ! तया सत्कर्मी रती वाढो ! भुता परस्प्सरे पडो ! मैत्र जीवांचे !!"
असे कधी म्हटलेच नसते.

तुकाराम महाराज हे फक्त बहुजनांचे असते तर त्यांनी
  "कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पुजनाचे ! " असे म्हटले असते काय??

मुळात संत हे जाती-भेद, मंगळ-अमंगळ या सर्वांच्या पलीकडे जाउन विश्वात भरून राहिलेल्या चैतन्याशी एकरूप झालेले असतात. आणि जिथे संपूर्ण चराचर म्हणजे आपणच हि भावना असते तिथे आपला आणि परका हा भेदच मुळी उरत नाही. असतो तो केवळ सर्वभूती ईश्वर दिसणारा प्रेमभाव ! अशा ठिकाणी जाती-भेदांची काय कथा ??

पण काही विशिष्ठ हेतू उराशी बाळगून समाजात चळवळी चालवणा-या स्वार्थी लोकांना संतांची हि विश्वात्मभावाची शिकवण काय कामाची?? ते कशाला हि शिकवण समाजाला सांगतील?? हिंदू धर्मावर टीका करणा-यांनी विश्वगुरु संत तुकाराम महाराज डोक्यावर घेतले ते त्यांच्या तत्कालीन सनातनी आणि वर्चस्ववादि वर्णाच्या लोकांशी झालेल्या संघर्षामुळे !! त्यांनी तत्कालीन समाजव्यवस्थेवर ओढलेल्या कडक ताशे-यांमुळे ! पण या पलिकडे तुकाराम महाराजांनी जी परमार्थाची शिकवण दिली ती जाणून बुजून डोळ्याआड केली गेली. कारण त्यातून लाभ साधता येणार नव्हता. 

तर इकडे समर्थ रामदास हे हिंदुचे राज्य निर्माण करू म्हणना-यांनी उचलून धरले ते त्यांच्या धर्मविषयक परखड आणि हिंदुत्ववाद्यांना सोयीच्या मतांमुळे !! पण समर्थ या पलीकडे आहे हे आम्ही जाणून घेतले नाही. समर्थांनी प्रपंचाचा विचार मुख्यत्वेकरून मांडला. पण प्रपंच हा परमार्थाला आवश्यक आहे म्हणून त्याचा मुख्य विषय केला हे सत्य आम्ही ध्यानात घेतले नाही. त्यांनी
"अवघा हलकल्लोळ करावा ! मुलुख बडवावा कि बुडवावा ! धर्मस्थापने साठी !!"
हे सांगितले खरे पण त्याआधी " देव मस्तकी धरावा !" हे सांगून परमार्थाची जाणीव करून दिली. परमार्थ मार्गी चालना-याने भिकारी जीवन जगावे आणि प्रपंचीकाने राजकारण करताना नुसता धर्माच्या नावावर उच्छाद मांडावा हे समर्थाना मान्य नव्हते. म्हणून तर ते चळवळी चालवताना भगवंताचे अधिष्ठान असावे असे म्हणतात.

खरे तर संतांच्या विश्वात्मभावाबद्दल लिहायचे झाल्यास खूप काही लिहिता येईल. पण माझ्या लेखनाचा उद्धेश तो नसून सध्या संतांच्या नावाने आणि विशेषतः संत तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास यांना जातीच्या बंदिस्त कावाडात उभे करून समाजात जातींच्या आधारे फुट पाडणा-या काही लोकांचे खरे स्वरूप उघड करणे हाच माझा हेतू आहे, म्हणून मी फक्त या संतांच्या समाजविषयक लेखनाचा आणि कार्याचा मागोवा माझ्या पुढील लेखात घेणार आहे.

सध्यातरी समर्थ रामदास स्वामी यांची एक हिंदीतील रचना खाली देत आहे. हि रचना वाचल्यावर आपल्या सर्वांच्या मनात एक विचार नक्की तरळून जाईल कि समर्थ रामदास हे जर जन्माने ब्राम्हण नसते तर आज त्यांच्या विरोधकानी त्यांना 'खरे सेक्युलर' म्हणून डोक्यावर घेतले असते.
बाजत नौबत झुलत हाथी
ले करे इतनाम
आखर वख्त कोई नही साथी 
जंगल भायो तमाम
बाबा दो दिन कि दुनिया
बात कीतनिया ??

मिल कबीला मकरबा बनाया
कहा गया जीवडा ?
अपनी नियत उद्फुल दिखावा
सड गया चमडा
हिंदू मुसलमान गुमान छोडो
नजीक ही मरणा

दास फक्कर सुफेज कलंदर
कहत जिक्र करणा रे
बाबा दो दिन कि दुनिया
बात कीतनिया ??

संदर्भ - ( श्री रामदास आणि रामदासी : भाग १, खंड १, पृ. २3२)
सत्कार्योतेजक सभा, धुळे : १९१७