मंगळवार, २७ नोव्हेंबर, २०१२

तुळशीच्या विवाहाबद्दल !!

ले काही दिवस....तुळशीच्या लग्नावरून काही हिंदू धर्म विरोधकांनी उच्छाद मांडला आहे.

माझ्या माहितीनुसार तुळशीच्या लग्नाची कथा हि पुराणातली आहे. आणि पुराणात अनेक अतिशयोक्ती असलेल्या गोष्ठी आहेत हे मी नाकारत नाही. काहीवेळा भक्ताची परीक्षा घेण्यासाठी किवा एखादे उद्धिष्ठ समोर ठेऊन देव विविध रूपे घेत असतो हा विचार पुराणांचा आधार आहे.

पण जर शांतपणे विचार केला तर एकीकडे देवाला सर्व शक्तिमान म्हणायचे आणि दुसरीकडे त्याच्या शक्ती सीमित करायच्या हा प्रकार पुराणात जाणवतो. जर देव सामर्थ्यवान आहे तर त्याला परीक्षा घेण्याची गरज नाही. तसे केल्यास त्याचे सामर्थ्य दिसत नसून त्याची कमकुवत बाजू दिसते. जसे कि एखाद्या शाळेत अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असतात. शिक्षकांना कोणत्या विद्यार्थ्याने कितपत ज्ञान ग्रहण केले आहे हे कळण्यासाठी अन्य कोणताही मार्ग उपलब्ध असल्याने परीक्षा घ्यावी लागते. इथे शिक्षकांची हतबलता प्रकट होते. आता काही जन म्हणतील कि देव आपल्या भक्ताची परीक्षा घेण्यासाठी आपल्या शक्तींवर बंधने घालून घेतो आणि त्याची परीक्षा घेतो. पण शेवटी प्रश्न हा उरतोच कि भक्ताची परीक्षा घेण्यासाठी देवाला आपल्या शक्तींव बंधने घालून घ्यावी लागतात ....याचा अर्थ देव बंधनात राहतो. आणि बंधनात राहील तो देव कसला?? कारण सर्व बंधनांच्या पलीकडे असलेली एक निरामय शक्ती म्हणजे देव........


मग पुराण खोटे आहे का?? नाही....पुराणातल्या अनेक गोष्ठींचे संदर्भ आज आपण लाऊ शकतो. पुराणाचे संदर्भ आर्यांच्या शोधासाठी काही पुरातत्व संशोधक वापरतात. याचाच अर्थ पुरण खोटे नक्कीच नाही. फक्त त्यात आपल्या उपास्य देवतेचे गुणगान गाताना अनेक अतर्क्य गोष्ठींचा समावेश करण्यात आला आहे. माझे मित्र श्री. अमित खोत यांनी अवतार या संकल्पनेबद्दल बोलताना एकदा सांगितले होते कि, राम, श्रीकृष्ण, परशुराम आणि इतर अवतार हि सामान्य माणसेच होती. पण त्यांच्या उत्तुंग कर्तुत्वामुळे त्यांचा संदर्भ परात्पर शक्तीशी जोडला गेला. जसे कि विष्णू हा सृष्ठीच्या तीन शाश्वत नियमांपैकी (उत्पत्ती, सरंक्षण आणि पालन, लय) एक नियम सरंक्षण आणि पालन - याचे प्रातिनिधिक रूप. या विष्णूचे जे पुराणातील नऊ अवतार आपण पहिले तर त्यांनी त्या -त्यावेळी जीवनाचे रक्षण केलेले आढळते. जीवसृष्ठीची सुरुवात जलचर प्राण्यांपासून झालेली आढळते. पहिला अवतार मत्स्यावतार......... इथून पुढे जे अवतार आहेत त्यांचे जीव उत्क्रांतीशी प्रचंड साम्य आढळून येते. अर्थात यातही परत त्या त्या टप्प्यातील सर्वोत्कृष्ठ जीवाला विष्णूचा अवतार मानले गेले. काही अवतार तत्कालीन समाजाने नाकारले देखील आहेत. जसे कि समुद्र मंथनाच्या वेळी विष्णूने धारण केलेला मोहिनी अवतार. जरी पुराणांनी मोहिनीला विष्णूचा अवतार मानले असले तरी त्यास समाजाने मान्यता दिली नाही.नाहीतर आज मोहिनीची देखील मंदिरे उभी राहिली असती.

तर अशी हि अवतार कथा. आपल्या उपास्य देवतेचे महात्म्य वर्णन करताना अनेक भक्तांनी अनेक पुराने रचली. त्यात थोडासाच भाग वास्तवाचा आणि बराचसा भाग अतर्क्य गोष्ठी आणि कल्पनांनी भरलेला आहे. याचबरोबर पुराणातल्या अनेक कथा या रूपके आणि अलंकारिक भाषेत सांगितलेल्या आहेत. यामुळे मूळ कथा शोधणे बरेच अवघड होऊन बसते. थोडेसे विषयांतर झाले आहे पण विषयाच्या ओघाने ते आवश्यक होते.

तर तुलसी विवाहाबद्दल जे प्रश्न उपस्थित केले जातात काहीसे असे आहेत.

एखाद्या पर पुरुषाने त्या स्त्रीवर बलात्कार केला म्हणून तिने स्वत:ला जाळुन घेतले तर त्या बलात्कारी पुरुषाचे परत त्याच स्त्रीशी लग्न का लावले जाते ?


कशाचे प्रतीक आहे हे ?


अस करण्यात त्या महारानी वृंदेचा अपमान नाही का ?


आणी विजय प्राप्त करण्यासाठी एका स्त्रिशी व्यभिचार करण्यात कसला आला पुरुषार्थ ?


तर काहीजण असे विचारतात कि
प्रश्न तुळशी महात्म्यचे नसून. बलात्कार सारखे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला देवत्व बहाल करण्याबाबत आहे. समाज बलात्कार करणाऱ्याला देवत्व कसे काय बहाल करू शकतो?

तुम्ही अशा व्यक्तीला देव म्हणणार का? हाच प्रश्न आहे. हो किंवा नाही. एका शब्दात उत्तर द्या.

याआधी तुळशीच्या कथेबद्दल जरा वाचूया...सर्वसामान्यपने कथा अशी आहे कि, जालंधर नावाचा राजा जो कि दैत्य होता तो आपल्या पराक्रमाने अजेय झाला होता. त्याच्या विजयाचे कारण त्याची पत्नी वृंदा हिचे पातिव्रत्य होय. जालंधर राजाला पराभुत करण्यासाठी त्याच्या पत्नीचे म्हणजेच वृंदेचे शिल भ्रष्ट करणे गरजेच होत आणी तिच शील विष्णूनी वेंशातर करुन केल , हे जेव्हा तिला समजल तेव्हा जगाला तोंड दाखवन्या पेक्षा महाराणी वृंदेने स्वत:ला जाळुन घेतल व त्या राखेतुन जे रोप आले ती म्हणजे "तुळशी"

मी जी कथा वाचली होती ती अशीच होती पण त्याचा अंत काहीसा वेगळा होता. त्यात म्हटले होते कि, त्या पतिव्रतेला जेव्हा खरा प्रकार कळला तेव्हा ती सती गेली. आपल्या हातून कोणते पाप घडले हे विष्णुला कळल्यामुले तो तिच्या चितेसमोर बसून रडत होता. तेव्हा लक्ष्मिने त्या चितेच्या ठिकाणी काही झाडे लावली. त्यातली एक तुळस. ती विष्णुला प्रिय झाली.

तरीपण एखाद्या राजाला हरवण्यासाठी देवाला वेषांतर करून जावे लागते हि कल्पनाच देवाच्या शक्ती सीमित करते. शिवाय जगाचा पालनहार असलेला देव एखाद्या स्त्रीचे पावित्र्य भ्रष्ठ करतो. मग तो देव कसला???

याच्यावर उत्तर म्हणून परत एक कथा मिळते ती अशी कि.

तुलसीच्या पूर्ण कथेच मूळ तिच्या पूर्व जन्मापासून सुरु होत जेव्हा ती ब्राह्मणांची मुलगी होती . तिचे वडील तिला घेवून विष्णूंच्या दर्शनाला जातात . तिच्या निरागस वृत्तीला न समजून घेता लक्ष्मीदेवी तिला दैत्य पती मिळेल हा शाप देते तेव्हा विष्णू लक्ष्मीवर क्रोधीत होवून म्हणतात तू या निरागस मुलीला दैत्य पती होण्याचा शाप दिलास मी हिला वरदान देतो कि यावद भूमंडळ आहे तो पर्यंत हि माझी पत्नी म्हणून ओळखली जाईल .
जालंदर हा लक्ष्मीचा भावू , तो पुढ वृदेंशी लग्न करतो आणि जगाला त्रास देतो , शिवाच आणि त्याच युद्ध चालू असताना वृदेंच्या शीला मूळ त्याचा पराभव होत नाही . तेव्हा विष्णू रूप बदलून तीच शील जगाच्या कल्याणासाठी भंग करतात . पुढे सत्य बाहेर आल्यावर ती विष्णूंना दगड होण्याचा शाप देते .तेव्हा विष्णू जे शाप आणि वरदान याच्यातून मुक्त आहे तो शाप धर्माचा मान राखण्यासाठी ग्रहण करतात .

परत प्रश्न कि कि, जगाच्या कल्याणासाठी केवळ एका स्त्रीचे शील भंग करणे हाच केवळ आणि केवळ एक  उपाय देवापुढे उरत असेल तर तो देव नक्की सीमित शक्तीवाला असेल. पण जगाचा पालनहार देव सीमित शक्तीचा कसा असू शकेल??? तो तर सर्व बंधनांच्या पलीकडे असतो.

या आणि अनेक प्रश्नांनी तुलसी विवाहाची कथा प्रश्नांच्या फैरी समोर उभी आहे.

मध्यंतरी मी एक संदर्भ वाचला होता तो असा कि,

वृंद हा शब्द समूह म्हणून वापरला गेला असावा जसे कि, ब्राम्हव्रुंद, वाद्यवृंद. जालंधरच्या जवळ अशा योद्ध्यांचा वृंद होता कि ज्यांची जालंधरावर पत्नीसारखीच  अभेद्य निष्ठा होती. विष्णूने ती निष्ठा भंग केली. आणि त्यामुळे जालंधराचा पराभव झाला. नंतर त्या योद्ध्यांच्या निष्ठेमुळे त्यांना कळून चुकले कि त्यांनी काय केले आहे आणि त्याचे प्रायश्चित्त म्हणून त्यांनी अग्निसमर्पण केले असावे. या कृत्यामुळे दुखी झालेल्या विष्णूने त्याठिकाणी तुळशीचे रोप लावले असावे. हळू हळू वृंदचे वृंदा झाले असावे. आणि त्यातून आजची कथा तयार झाली असावी. पण काही गोष्ठींचा विचार केल्यास हा तर्क योग्य वाटत नाही.

म्हणजे एवढे फिरून परत हाती काही लागत नाही. शेवटी मला एक गोष्ठ आठवते. रमाबाई रानडे यांना त्यांचा घरगडी त्यांच्या समाजात प्रचलित असलेल्या देवाच्या गोष्ठी सांगायचा त्यात हिराण्याकाश्यापुच्या पोटी प्रल्हादाचा जन्म झाला हे सांगताना तो सांगायचा कि, "हरण -कासवाच्या पोटी परळादाचा जन्म झाला." त्याला विचारले कि, "विष्णूचे नऊच अवतार झालेत..." तर तो म्हणायचा कि " देवाला जगाच कल्याण करण्यासाठी असे असंख्य जन्म घ्यावे लागतात."

पुराणातल्या कथांच्या मुळाशी देखील अशाच दंतकथा असण्याची शक्यता वाटते. या विषयावर जितके बोलावे तितके कमीच आहे.

तेव्हा माझा याबाबतीत एक साधा तर्क आहे.

श्रीकृष्णाच्या गोकुळाला देखील वृंदावन म्हणत असत. तुळशीचे देखील वृंदावन असते. गोकुळातील म्हणजेच वृंदावनातील कुमारिका या श्रीकृष्णावर प्रेम करायच्या. तुळस देखील कुमारिका समजली जाते. पण तिला कुमारिका ठेवल्यामुळे तिला पूर्णत्व प्राप्त होत नाही. त्यासाठी मग तिचे श्री कृष्णाशी लग्न लावले गेले असावे. पुढे तुळशीचे महात्म्य वाढवण्यासाठी वृन्देची कथा निर्माण करून या सर्व गोष्ठीना आधार देण्याचा प्रयत्न केला गेला असावा. त्यासाठी हिंदू विचारधारा आणि बौद्ध विचारधारेचा सुंदर मिलाप करणारे श्री. मधुसूदन चेरेकर सरांनी सांगितल्याप्रमाणे एका जातक कथेचा आधार घेतला गेला असावा. बौद्ध जातकात एका कथेत बोधिसत्व हा जुगारी असतो.त्याचा प्रतिस्पर्धी आपल्या पत्नीच्या पातिव्रत्याची शपथ घेवून सोंगट्या टाकत असतो आणि नेहमीच जिंकत असतो.तेव्हा बोधिसत्व एका पुजार्यास प्रतिस्पर्ध्याच्या पत्नीकडे पाठवून तिचे पातिव्रत्य भंग करवतो आणि मग जुगार जिंकतो अशी कथा आहे.

चेरकर सरांनी म्हटल्याप्रमाणे वृंदेची पुराणकथा या जातककथेचेच रूपांतर असावे. किवा वृन्देची कथा हि झाली असावी आणि त्यात देवांना विजय मिळवण्यासाठी जो छल केला गेला त्याला तुळशीच्या लग्नाचा आधार देऊन आणि विष्णूचे महात्म्य वापरून लपवण्याचा देखिल प्रयत्न केला गेला असावा.

अर्थात हे आपण आजच्या काळात हजारो वर्षांपूर्वी घडून गेलेल्या घटनांचा अर्थ लावायचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे काही गोष्ठी चुकीच्या वाटू शकतील पण त्यासाठी देव नाकारण्याची गरज नाही.

ज्यांचा देवावर विश्वास नाही त्यांनी हि कथा खरी मानून वाद घालण्यात अर्थ नाही. आणि ज्यांचा देवावर विश्वास आहे त्यांनी देवाला आपण कोठे नेऊन ठेवत आहोत याचा विचार करावा.

मला विचाराल तर श्री कृष्णाचा आणि विष्णूचा संबंध पुराणांनी अवताराच्या माध्यमातून जोडल्यामुळे ह्या कथा आकारास आल्या असाव्यात. पण म्हणून तुळशीचे लग्न लावण्यासाठी देवाला आरोपीच्या पिंज-यात उभे करणे योग्य नव्हे. ह्या गोष्ठी सामान्य माणसांच्या कल्पनेतून जन्माला आल्या आहेत. त्यांना या अशा कथांच्या माध्यमातून देवाला आपन व्यभिचारी ठरवत आहोत याची जाणीव करून दिली तरी पुरेसे आहे.

शिवाय या कारणासाठी तुळशीचे लग्न लाऊ नये म्हणे देखील चुकीचे ठरू शकते. कारण माझ्या माहितीनुसार वर्षात तुळशीचे लग्न आधी लागते मग आपल्या घरात लग्नकार्ये करण्यास सुरुवात केली जाते. कदाचित असेही असेल कि आधी देवाचे लग्न लावावे मग आपल्या घरातले लग्न कार्य करावे अश्या विचारधारेतून हि कथा उगमास आली असेल. देवाचे लग्न लावायचे कोणाशी तर???....पूर्वीपासून घरचीच एक सदस्य असलेली तुळस जिला वर्षभर कुमारिका म्हणून ठेवलेले असते तिच्याशी लग्न लाऊन द्यायचे. म्हणजे तुळशीला पूर्णत्व प्राप्त होईल. स्वार्थातून परमार्थ साधण्याचा विचार या मागे असावा.

असो. मी काही धर्मज्ञ नाही. एक हिंदू म्हणून जे मला वाटले....ते मी मांडले. अर्थात यासाठी माझा धर्म मला इशद्रोही, ईश्वरी ग्रंथाला न मानणारा ठरवून दगडांनी ठेचून मारण्याची आज्ञा नक्कीच देणार नाही.

६ टिप्पण्या:

  1. ब्लॉग मध्ये आपला पुरता गोंधळ उडालेला दिसतो आहे.तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे,ते तुम्ही स्पष्ट न सांगता केवळ लोकांना देवाची भीती दाखवत आहात! "ज्यांचा देवावर विश्वास आहे त्यांनी देवाला आपण कोठे नेऊन ठेवत आहोत याचा विचार करावा","अशा कथांच्या माध्यमातून देवाला आपन व्यभिचारी ठरवत आहोत याची जाणीव करून दिली तरी पुरेसे आहे."या विधानांवरून आपण लोकांना देवाची भीती दाखवत आहात!

    उत्तर द्याहटवा
  2. माझा गोंधळ उडालेला नाही. या ब्लोग मध्ये मी फक्त सामालोचाकाचे काम केले आहे. ज्या अनेक कथा आहेत त्या मांडून निणर्य घेणे वाचकांवर सोडलेले आहे. राहिला प्रश्न…
    "अशा कथांच्या माध्यमातून देवाला आपन व्यभिचारी ठरवत आहोत याची जाणीव करून दिली तरी पुरेसे आहे."

    या विधानाचा तर… मी कोणाला देवाची भीती घालत नसून आजु बाजूला घडणा-या घटनांचा संबंध देवाशी जोडणा-या लोकांना ते काय करत आहेत याची जाणीव करून देत आहे. कारण या अशा कथांची चिकित्सा जेव्हा केली जाते तेव्हा त्यांच्यातला फोलपणा समोर येतो आणि मग लोक देवालाच आरोपीच्या पिंज-यात उभे करण्याचा प्रयत्न करतात.

    उत्तर द्याहटवा

  3. तुळशीचे लग्न एक समिक्षा....

    विष्णूबरोबर तुलशीच लग्न लावणे म्हणजे
    तुळशीची बदनामी करणे होय.....
    तुळशी (वृंदा) ही या देशातील मूळचा निवासी असूर सम्राट जालंधर याची पत्नी होती.
    परकीय अर्याना त्याचा पाढाव होत
    नव्हता...... त्याची पत्नी वृंदा ही त्यामध्ये मुख्य
    आडसर होती, म्हणून विष्णू नावाच्या तत्कालीन आर्य पुढार्याने
    वृंदेवर बलात्कार केला...... तीचे शील भ्रष्ट केले..... तीचा खून
    केला किंवा तीला आत्महत्या करायला भाग पाडले..... आणी आर्य देवांनी त्याचे राज्य कपटाने बळकविले.

    वृंदा ही जनतेत आतिशय लेकप्रिय होती... जनसामान्याना तीच्या मृत्युमुळे असामान्य धक्का बसला... वृंदेची आठवण म्हणूण घराघरासमोर जनतेने वृंदावन बांधले व जनता त्या वृंदावनाच्या रुपात आपल्या त्यामहान राणीची आठवण जतन करु लागली. कालांतराने येथे आर्य देवांचा संपूर्ण आम्मल निर्माण झाल्यावर देवांनी वृंदा-तुळशीचा विवाह ज्याने तिच्यावर बलात्कार केला होतात्या विष्णू नावाच्या आर्य देवाशी लावण्याचा ऊत्सव सूरु करुन महान जालंधर आणी वृंदेवर सूड ऊगविला.

    मुलनिवासी असुर-बहुजनांचा आपमान
    केला व आजही करत आहेत.....!
    ज्या विष्णूने विवाहीत आसणार्या वृंदेवर बलात्कार केला त्याचाच विवाह वृंदेबरोबर लावणे ही आर्य देवांची विकृती आहे......
    तुळशीची बदनामी करणार्या ब्रह्मविकृतीला बळी पडू
    नका...... महानायीका तुळशीला बदनाम
    करु नका.......! (वैदिक पुराणानी तुळशी वरील विष्णूच्या बलात्काराला वैध ठरविण्यासाठी त्यांची बदनामी केली आहे. वस्तुतः तो एक प्रजावत्सल राजा होता)



    संदर्तुभ : तुळशीचे लग्न एक समीक्षा : आ.ह.साळुंखे

    उत्तर द्याहटवा