आत्ताच एक लेख वाचला. त्यात एका तथाकथित लेखकाने (?) सदाशिव राव भाऊ हेच स्वामी समर्थ असल्याचे मांडले आहे. वाचकांच्या सोयीसाठी त्या लेखातील तो मुख्य गाभा अधोरेखित करून देत आहे.
हा लेख वाचल्यानंतर या लेखकाच्या बुद्धीवर हसू तर आलेच. पण अश्या मूर्खाना लेखक म्हणून आमचा समाज डोक्यावर कसा घेतो हेच काळात नाही.
तर आता लेखाची थोडी चिकित्सा करूया,
या लेखात लेखक म्हणतो कि,
१३ फेब्रुवारी १७६० रोजी सदाशिवराव भाऊ यांना पानिपत मोहिमेवर पाठवण्याचे निश्चित झाले.
३० मे १७६० रोजी सदाशिवराव भाऊ ग्वाल्हेर मार्गे पानिपतावर प्रयाण करते झाले.
१४ जानेवारी १७६० रोजी पानिपतावर लढाई झाली.
आता मला एक काळात नाही कि १३ फेब्रुवारी रोजी पानिपतावर जाण्याचे निश्चित झाल्यावर त्यानंतर साधारण २.५ ते ३ महिन्यांनी पानिपातासाठी मार्गस्थ झालेले सदाशिवराव १४ जानेवारी १७६० रोजी म्हणजे मोहिमेचा बेत ठरण्याच्या आधी एक महिना आणि प्रत्यक्ष प्रयाण करण्याच्या ४ महिने आधी पानिपतावर जाऊन कसे लढू शकतील???
कारण आम्हाला शाळेत शिकवल्याप्रमाणे मे महिना हा जानेवारीनंतर येतो.
काहीजण म्हणतील कि प्रिंटींग मिस्टेक असू शकेल. पण हा लेख किवा या लेखाचा आशय मी गेल्या एक वर्षापासून ऐकतोय. मुळात या लेखाचा काळ हा त्या आधीपासूनचा असू शकतो. पण या एका वर्षात देखील सदर लेखकास एकदाही वाटले नाही कि सदर चूक सुधारून घ्यावी?? अर्थात तशी चूक सुधारून लेखक दुसरी चूक करू इच्छित नाही. कारण त्याच्या या स्वनिर्मित शोधाचा पायाच मुळात या एका चुकीवर उभारलेला आहे.
कारण या त्यापुढील परिच्छेदात लेखक म्हणतो कि, स्वामी समर्थ नेमके मंगळवेढ्याला १७६०/६१ च्या दरम्यान आले.
स्वामी समर्थांचे मंगळवेढ्यातील आगमन आणि सदाशिव राव भाऊ यांना पानिपतावर वीरगती प्राप्त होणे या दोन्ही घटनांत १७६० हा सामान्य दुवा दाखवून लेखक हे सिद्ध करू पाहत आहे कि, स्वामी समर्थ हेच सदाशिवराव भाऊ होत.
कसे असते ना, सामान्य लोकांना इतिहासातील घटनांच्या तारखांशी काही देणे घेणे नसते. त्यांना त्या त्या घटनेशी मतलब असते. आणि लोकांच्या या मानसिकतेशी खूप चांगला परिचय असल्याने लेखकाने मुद्दाम तारखांचा हा घोळ घातला आहे.
सदाशिव राव भाऊ यांना १४ जानेवारी १७६१ साली पानिपतावर वीरगती प्राप्त झाली. त्यांचे शरीर शोधून अयोध्येचा नवाब शुजा उद्दौलाच्या मदतीने शुजाचा सल्लागार काशीराज पंडित याने अंत्यविधी केला होता. माधवराव पेशवे यांनी त्याची हकीकत जाणून घेऊन मगच सदाशिव राव भाऊ म्हणून आलेल्या तोतयाचे न्यायदान केले होते.
तरीसुद्धा वादासाठी लेखकाकडून किवा प्रिंटींग मिस्टेकमुळे १७६१ ऐवजी १७६० असे लिहिले गेले हे मान्य केले तरी पुढे काही प्रश्न निर्माण होतात.
पानिपातावरील लढाई झाली तेव्हा सदाशिव राव भाऊ ह्यांनी तिशी ओलांडली होती.
स्वामी समर्थ यांनी आपले अवतार कार्य इसवी सन १८७८ मध्ये संपवले.
म्हणजे सदाशिवराव भाऊ हेच स्वामी समर्थ आहेत हे मान्य केले तर सदाशिवराव भाऊ १४८ वर्षे जगले.
आता हा चमत्कारच म्हणावा लागेल.
कारण युद्धभूमीवर सतत लढाया करणारे खूप कमी योद्धे आपल्या आयुष्याची पंच्याहत्तरी गाठू शकले आहेत.
आता मला प्रश्न हा पडला आहे कि, आम्ही ब्राम्हणी खोट्या इतिहासाला भुलणार नाही म्हणणारे आमचे बहुजन बांधव या अशा खोट्या आणि सकाळी लहान मुलांच्या प्रातःविधीसाठी वापरता येईल अशा पुस्तकातील लेख वाचून त्यावर विश्वास कसे ठेऊ शकतात??
(टीप - आपले मत विचार करून मांडावे.)
संदर्भ - http://en.wikipedia.org/wiki/Sadashivrao_Bhau
http://en.wikipedia.org/wiki/Shri_Swami_Samarth
http://en.wikipedia.org/wiki/Battle_of_Panipat_%281761%29
सुंदर विश्लेषण!
उत्तर द्याहटवा