सोमवार, २ जुलै, २०१२

सुवर्णाक्षरात लिहिलेला इतिहास कि अंधकारात लपलेलं भविष्य???


मध्यंतरी आम्ही काही मित्र चर्चा करत होतो. विषय होता आयुर्वेद आणि घरगुती औषधे. त्यावेळी एक मित्र म्हणाला, " जर आता इथे एखादा पाश्चिमात्य देशातला व्यक्ती असता तर त्याने लगेच हे सगळं लिहून घेतलं असतं. आज काही सांगा लगेच आमचे लोक म्हणतात, 'अरे हे तर आमच्या पुराणात केव्हाच सांगून ठेवलंय.'...... अरे पण त्याचा तुम्हाला उपयोग काय??? आपल्या पूर्वजांनी हे जे ज्ञान जतन करून ठेवलंय ते त्यांच्या वंशजांना ' हे तर आमच्या पूर्वजांना माहित होतं' असा म्हणता यावं म्हणून नव्हे तर त्या ज्ञानाचा आपण उपयोग करून सर्वार्थाने प्रगती करावी म्हणून.

मोहम्मद घोरी याने जेव्हा भारतावर आक्रमण केले तेव्हा त्याच्याबरोबर एक कवी होता. अल बेहरुनी हे त्याचं नाव. तो म्हणतो, " ह्यांची संस्कृती आहे महान! पण ह्यांना असं वाटतं कि ह्यांचीच संस्कृती काय ती महान आहे. जग कुठे चाललंय याकडे यांचं लक्ष नाही."

याचीच फळं आपण गेले हजार वर्ष भोगत आहोत.

आपल्या प्राचीन ग्रंथात अतिशय पराकोटीच ज्ञान उपलब्ध आहे. आणि हे आपल्या पूर्वजांनी कोणत्याही आधुनिक भौतिक साधनांच्या उपलब्धीशिवाय मिळवले आहे. पण आम्हाला त्याचे काय?? आम्ही फक्त म्हणणार आमच्या पूर्वजांनी हे केले आणि ते केले.....पण आम्ही त्यातून काही बोध मात्र घेणार नाही.

आम्ही फक्त जय शिवराय म्हणणार...पण शिवाजी महाराजांनी भगवती दुर्गावर तोफा गाळण्याचा स्वतःचा कारखाना सुरु केला हे कधी समजून घेणार नाही. आम्ही सांगणार कि 'माझ्या राजाने अठरा कारखाने बारा महाल बनवले.' पण त्या बारा कारखान्यात काय बनवले जात होते ते पाहणार नाही.

आज भारतात प्रत्येक लहान मुलाला तुळस, हळद यांचे औषधी गुणधर्म माहित आहेत. पण हळदीच्या पेटंटसाठी आम्हाला महाद्प्रयास करावे लागतात. चार वर्षापूर्वी ऐकलं होतं कि अमेरिका आता तुळस आणि गोमुत्र यांच्या औषधी गुणधर्माचे पेटंट मिळावे म्हणून प्रयत्न करत आहे, पण आम्ही मात्र झोपलेलेच. आमच्या पुराणांचा अभ्यास करून काही विदेशी शास्त्रज्ञ डॉक्टरेट मिळवत आहेत. आणि आम्ही???

मध्यंतरी एका चर्चेत एक जन म्हणाला कि, वेदांचा अभ्यास करून लोकांच्या पोटाचा प्रश्न सुटणार नाही. मी त्याला म्हटले का सुटू शकणार नाही?? आज जागतिक मान्यताप्राप्त पुरातत्व शास्त्रज्ञ त्रूग्वेदाचा अभ्यास मानव जातीचा इतिहास अभ्यास करण्यासाठी करत आहेत. अशा प्रकारच्या संशोधनातून त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटू शकतो.... मग आपण का करत नाही???

बिग बेंग थेअरीचा प्रयोग जिथे चालू आहे त्या युरोपीय ऑर्गनाईजेशन फोर न्युक्लिअर रिसर्च या संस्थेच्या प्रांगणात नटराजाची मूर्ती स्थापन केली गेली. कारण अनेक वर्ष संशोधन करून त्यां पाश्चात्य संशोधकांनी जे सिद्धांत मांडले ते भारतीय वेद आणि पुराणात जसेच्या तसे खूप आधीपासूनच जतन करून ठेवलेले त्यांना आढळले. आज त्यातले बरेच शास्त्रज्ञ आता वेद आणि पुराणांचा अभ्यास करत आहेत.

पण आम्ही काय करणार? मध्यंतरी एका मित्राने म्हटले होते कि या देशात जर एक स्वयंचलित कार निर्माण केली गेली तरी लोक तिने ताशी किती किमी प्रवास केला हे पाहणार नाहीत तर त्या गाडीने किती रस्ता मागे टाकला हे पाहतील....

आणि दुर्दैवाने हे खरे आहे. आम्ही फक्त इतिहासातच रमतो. वर्तमान आणि भविष्य याकडे आमचे लक्ष नाही.

आज आपल्या देशासमोर बेकारी हा सर्वात मोठा प्रश्न आहे. पण मी म्हणेन कि बेकारी नाही तर बेकार मनाची माणसे हा या देशासमोरील मोठा प्रश्न आहे. आम्हाला नोक-या मिळत नाहीत म्हणून आम्ही सरकारला आणि व्यवस्थेला दोष देत बसतो. पण आपल्याच देशात, आपल्याच प्राचीन ग्रंथात अशा कितीतरी गोष्ठी आहेत कि त्यांचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर आपला पोटापाण्याचा प्रश्न सुटू शकतो. ग्रामीण भागातील तरुण नोकरी-धंद्यासाठी मुंबईत येतात आणि नोकरी मिळाली नाही कि आत्महत्या करतात किवा निराशा त्यांना ग्रासते. काही प्रमाणात शहरी भागातील तरुणांची अवस्था सुद्धा हीच आहे. अरे पण तुमच्याकडे जमीन आहे, ती जमीन वापरा. मान्य कि पाऊस नसल्याने तुम्ही शेती करू शकत नाही पण तीच माती प्लास्टिकच्या पिशव्यांत भरून विकू शकता ना?? शहरात अशी कित्येक माणसे आहेत जी अशी माती विकत घेतात. आयुर्वेदाचा अभ्यास करा. गोपालन करा. अगदीच काही नाही तरी वेदिक गणिताचा अभ्यास करून तुम्ही स्वतःचे शिकवण्या घेऊ शकता.

माझ्या अल्पबुद्धीला जसे सुचले तसे काही पर्याय सुचवले आहेत. तुम्ही सुजाण आहात.

भूतकाळात रमण्यापेक्षा आपल्या भूतकाळाच्या बळावर आपला वर्तमान आणि भविष्य कसे सुखी करता येईल याचा विचार करणे आपण आवश्यक आहे.

जय हिंदुराष्ट्र!!



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा