बुधवार, २३ मे, २०१२

माझ्या नजरेतून हिंदू धर्म - एक अनादी अनंत विचारधारा !!!


आत्ताच माझे एक मित्र श्री. ऋषिकेश मोरे यांनी माझी धर्माची व्याख्या काय आहे असे विचारले. माझी धर्माची व्याख्या सरळ आहे. धर्म हा शब्द 'धृ' या धातूपासून बनला आहे. त्याचा अर्थ होतो 'धारण करणे'. धारण करण्यास जो योग्य आहे आणि धारणेनुसार जो बदलत जातो तो धर्म. हेच कारण आहे कि आपल्या धर्मग्रंथात हिंदू धर्म नावाचा वेगळा धर्म आहे असे कधी सांगितले नाही. कारण मानवी जीवनातली प्रत्येक गोष्ठ धर्माशी निगडीत असते. काय खावे, कसे खावे, काय प्यावे, काय नेसावे या सगळ्या गोष्ठी धर्मांतर्गत येतात. थोडक्यात माणसाचे आचरण कसे असावे हे सांगतो तो धर्म - मग यात पतीधर्म, पत्नीधर्म, पुत्रधर्म, शेजारधर्म, राष्ट्रधर्म हे सगळे धर्म आले. आणि या सगळ्या गोष्ठी ज्यात एकत्रित होतात ती संस्कृती असते. त्यामुळे हिंदू हा धर्म नसून ती संस्कृती आहे. आणि ह्याच कारणामुळे आपल्या त्रुशीमुनींनी, साधू संतानी धर्म म्हणून हिंदू धर्माचा कधी उल्लेख केला नसावा. आणि हेच कारण आहे कि या संस्कृतीचा कोणताही एक विशिष्ठ असा धर्मग्रंथ नाही. मध्यंतरी माझे आणखी एक मित्र श्री. सतीश पवार यांनी म्हटले होते कि भगवान श्रीकृष्ण हे बंडखोर प्रवृत्तीचे होते. आणि त्यांचे म्हणणे काही अंशी खरेही आहे. मुळात संपूर्ण हिंदू संस्कृती हि बंडखोर वृत्तीचे प्रतिक आणि पर्यायाने प्रगतीशील विचारांची आहे असे मला वाटते. कारण यात तुम्हाला कोणत्याही दोन पानांच्या आत बंदिस्त केले जात नाही. तुम्हाला जी विचारधारा पटेल ती तुम्ही स्वीकारू शकता आणि गरज पडल्यास एखादी नवीन विचारधारा रुजवूहि शकता. असो. हिंदू संस्कृती इतकी व्यापक आहे कि मी तिच्याबद्दल बोलणे म्हणजे अंधारात चमकणा-या परप्रकाशित काजव्याने सूर्याचे पोवाडे गाण्यासारखे आहे. ज्याला जसा हवा तसा माझा धर्म दिसतो.

हिंदू धर्मात अनेक देवी देवता आहेत. प्रत्येक देवाची उपासना करणारे वेगवेगळे पंथ आहेत. ज्याला ज्या देवतेची उपासना करायची आहे ती तो करू शकतो. ज्याला देवाचे अस्तित्वच मान्य नाही तो देखील त्याला हवे तसे समाजात वावरू शकतो. हे अशाप्रकारचे व्यक्तीस्वातंत्र्य इतर कोणत्याही धर्मात आढळणार नाही. कारण तिथे एक धर्मग्रंथ आणि एक देव जो त्या धर्मग्रंथात सांगितला आहे..बस!! या पलीकडे काही नाही. त्या धर्मग्रंथाच्या दोन कव्हर पेज मध्ये तुमचे धार्मिक आयुष्य कैद असते. हिंदू धर्मात असे नाही. मी स्वतः फारसा देवळात जात नाही. कारण देखल्या देवा दंडवत असा प्रकार मला मान्य नाही. परमेश्वर माझ्या हृदयात आहे हे तत्वज्ञान मला मान्य आहे.

मुळात हिंदू धर्मात अनेक प्रकारचे (३३ कोटी) देव आहेत यावरून काहीजण वाद घालतात. कि एक ईश्वर संपूर्ण चराचर व्यापून आहे असे असताना ३३ कोटी देव हिंदू धर्मात कसे आले?? ते ३३ कोटी देव कोणते हे माझे मित्र श्री. विक्रम एडके यांनी मागे दाखवून दिलेच आहे. परंतु त्यामागचे तत्वज्ञान मी परत एकदा सांगत आहे. हिंदूंमध्ये अनेक देवता आहेत परंतु शेवटी एकच असे निरामय आणि अनादी असे तत्व आहे हे त्या अनेक देवतांची भक्ती करणा-या व्यक्तीला सहज समजून येते. कसे ते पहा. एखादी व्यक्ती समजा आधी भवानी मातेची उपासना करत असेल तर कालांतराने जशी त्याची भक्तिमार्गात प्रगती होत जाते तसे त्याला अनुभूती येत जाते कि भवानीमाता, कालीमाता, अंबाबाई या सगळ्या त्या आदिमायेचेच रूप आहेत. मग तो त्या आदिमायेची भक्ती करू लागतो. हळूहळू त्याला जाणवू लागते कि ज्या आदिमायेची उपासना करतो आहे ती शिवाच्या अर्ध्या शरीरातून निर्माण झाली आहे. मग तो शिवाची भक्ती करू लागतो. त्यानंतर त्याला जाणवू लागते कि शिवाच्या पलीकडेही एक परात्पर शक्ती आहे जी संपूर्ण विश्व व्यापून उरली आहे. मग तो त्या परात्पर शक्तीची उपासना करू लागतो. ज्याप्रमाणे १-१० असा आपला शाळेचा अभ्यासक्रम आहे तसाच हा भक्ती मार्गाचा प्रवास आहे. सामान्य जणांना तो पचेल आणि रुचेल आणि पेलेल अश्या स्वरुपात तो आपल्या त्रुशी मुनींनी आपल्याला सांगितला आहे. मी जर चुकत नसेन तर येशू ख्रीस्तानी एके ठिकाणी स्वर्गात राहणारा आमचा पिता असा उल्लेख केला आणि दुसरीकडे ते ईश्वराचे राज्य तुमच्या हृदयातच आहे असे म्हणतात. असे का?? या दोन विधानांची सांगड कशी लावता येईल हे स्वामी विवेकानंद यांनी सांगितले आहे. कि सामान्याजानांशी बोलताना त्यांनी स्वर्गातला पिता असा उल्लेख केला आहे. कारण बहुजन समाजाला समजेल अशाच भाषेत त्यांना अध्यात्माचे धडे द्यावे लागतात. तर ईश्वराचे राज्य तुमच्या हृदयातच आहे असा उल्लेख त्यांनी अध्यात्माच्या जाणकारांसाठी केला आहे.

हिंदू धर्माबद्दल जितके बोलावे तितके कमीच आहे. कारण हि नित्यनूतन अशी विचार धारा आहे. तिला कशाचे बंधन नाही. ती अनादी अनंत आहे.



५ टिप्पण्या:

  1. Hindu dharmat bandhane nahit ase kase mhanata tumhi? ulat yaat bandhane ahet mhanunch ya dharmach acharan karanaryacha swatavaracha taba sutat nahi

    उत्तर द्याहटवा
  2. हिंदू धर्मात बंधने नाहीत. ज्याला जी गोष्ठ आचरणात आणायची आहे तिच्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे जरूर आहेत. आणि मार्गदर्शक तत्वे म्हणजे बंधने नव्हेत. साधकांना आपल्या ध्येय प्राप्तीसाठी आवश्यक असलेली तत्वे म्हणजे बंधन असू शकत नाहीत. हिंदू धर्म म्हणजे कोणा प्रेषिताने सांगितलेल्या एखाद्या ग्रंथातील वचणे नव्हे ज्याला कोणी विरोध करू शकत नाही. त्याला ती बंधनकारक असतात. हा धर्म असा एकमेव धर्म आहे जो पिंडे पिंडे मती भिन्ने हे मानतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीस त्याच्या पातळीनुसार भक्ती किवा साधना करता येते. आणि आम्ही बंधने नाहीत असे म्हटले आहे कारण आमचा एक विशिष्ठ असा धर्मग्रंथ नाही जो सर्व गोष्ठीना प्रमाण असेल. त्याच्या विरोधात कोणी जाऊ शकणार नाही.

    उत्तर द्याहटवा
  3. स्वामी दयानंद सरस्वती म्हणतात "हिंदू हि मोगलांनी दिलेली शिवी आहे . हि म्हणजे हीन आणि दु म्हणजे दुय्यम म्हणजेच शुद्र ,तुछ्य ,गुलाम ,जिंकून घेतलेले होय ." म्हणूनच दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली . हिंदू समाजाची नव्हे


    हे खरे आहे का ?

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. हिंदू हि मोगलांनी दिलेली शिवी नाही. कारण जेव्हा पैगंबर जन्माला यायचा होता त्या आधीपासून सप्त सिंधूचा प्रदेश हिंदूभूमी परिचित होता. झेंड अवेस्ता हा पारशी लोकांचा धर्मग्रंथ असून त्यात फरगार्द या भागात ज्या सोळा स्थानांवर पारशी लोकांचा नेता अहुर माझदा याने पारशी समुदायाला घेऊन भटकंती केली त्यात हप्तहिंदू असा सप्तसिंधू भूभागाचा उल्लेख आहे. त्यामुळे फारतर असे म्हणता येईल कि हिंदूलोकांचा उच्चार मुघल अपमानजनक भाषेत करायचे. पण हिंदू हा शब्द शिवी नाही. कारण पैगंबराच्या एका पत्नीचे नाव देखील हिंद होते.

      हटवा